अमरावती:जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एकीकडे निवडणुकीसाठी कालपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली असून त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यास सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे गावनेत्यांच्या शहरातील आणि गावातील बाहेरगावी असलेल्या मंडळीशी गाठीभेटी वाढल्या आहेत.
गाठीभेटी वाढवण्यात गाव नेते व्यस्त:गावातील बरीचशी मंडळी व्यवसाय वा नोकरी या निमित्ताने शहरात स्थायिक आहेत. मात्र त्यांचे मतदान नाव अजूनही गावच्या मतदार यादी मध्येच आहे. त्याचप्रमाणे काही युवक आणि काही कामगार सुद्धा बाहेरगावी स्थायिक झाले आहेत. त्या सर्व नागरिकांचे मतदान गावातच आहे. त्यापैकी कोणाचे मतदान कुठल्या वार्डात आणि गावात आहे. हे गाव नेत्यांना चांगलंच माहीत असते, म्हणूनच अशा लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी गाठीभेटी वाढवण्यात गाव नेते व्यस्त झाले आहेत.