अमरावती - मेळघाटातील शेकडो आदिवासी कुटुंब हे पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावती लगत अंजनगाव बारी रोड परिसरातील वीट भट्टीवर काम करण्यासाठी येत असतात. मात्र, त्यामध्ये त्यांच्या मुलाचे शिक्षण वाया जात होते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने एका शेतात या मुलांसाठी वीटभट्टी शाळा सुरू करण्यात आली होती. या उपक्रमाची बातमी 'ईटीव्ही भारत'ने दाखवली होती. यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळेला भेट देऊन तात्पुरती मदत केली होती. दरम्यान, आज या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नने १०८ विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत जाण्यासाठी प्रति एक विद्यार्थ्याला वार्षिक १८०० रुपये वाहतूक खर्च मिळणार आहे, अशी माहिती दिली. तसे परिपत्रक हे शासनाकडून जारी करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी हे रोजगाराच्या शोधात बाहेर गावी जातात. त्यातीलच अनेक कुटुंब हे वीटभट्टी वर काम करण्यासाठी दिवाळी नंतर येत असतात. त्यांच्यासोबत येणाऱ्या त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. मात्र, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि डायट यांच्या माध्यमातून एका शेतात ६५ विद्यार्थ्यांची एक शाळा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जिथे ही शाळा भरत होती त्या मालकाने शेत विकल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, 'ईटीव्ही भारत'ने दाखवलेल्या बातमीनंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतुक खर्च म्हणून तात्पुरती मदत केली होती. त्यानंतर सर्व विभागाची आढावा घेऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वीटभट्टी कामगार मुलाच्या सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.