अमरावती Girl Suicide:प्रियकराकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ती युवती मैत्रिणीसह भाड्याच्या खोलीत राहत होती. या प्रकरणात मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पुण्यातील रहिवासी असणाऱ्या संजय जाधव याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रियकराकडून घेतला गेला गैरफायदा:मृत विद्यार्थिनी ही मूळची यवतमाळ जिल्ह्यातील नेरपणसोपंत तालुक्यातील रहिवासी होती. अमरावतीत ती शिक्षणासाठी आली असता एका मैत्रिणीसह ती राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात एका ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थिनी आणि पुण्यातील रहिवासी संजय जाधव यांची ओळख झाल्यावर संजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर तिचा गैरफायदा घेऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे काही दिवसांपासून विद्यार्थिनीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. गुरुवारी तिची मैत्रीण घरी नसताना तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब शेजाऱ्यांना कळताच तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच तिचे वडील अमरावतीत आले.
वडिलांना बसला मोठा धक्का:अभ्यासात अतिशय हुशार असणाऱ्या आपल्या मुलीने आत्महत्या केल्यामुळे तिचे वडील प्रचंड हादरले. विद्यार्थिनीने असे पाऊल नेमके का उचलले याची त्यांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता मैत्रिणीने संजय जाधव नामक युवकाने मृत विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचा गैरफायदा घेऊन तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी असे मैत्रिणीने सांगितले. यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांनी संजय जाधव या युवकाविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी संजय जाधव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलीस करणार तपासणी:राजापेठ पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या मैत्रिणीचे बयान पोलीस नोंदविणार आहेत. यासह मृत विद्यार्थिनीचा मोबाईल सीडीआर देखील पोलीस तपासणार असल्याची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी दिली.
हेही वाचा:
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, इंद्रायणी नदीत उडी मारून जीवनयात्रा संपवली
- Maratha Youth Suicide : मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ
- Suicide Attempt In Ministry: नोकरीसाठी प्रकल्पग्रस्ताकडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न, मंत्रालयातील 'त्या' कृतीनंतर पोलिसांनी केली अटक