अमरावती: अचलपूर तालुक्यातील गावातून मध्यरात्रीच्या वेळी नराधमाने तरुणीचे अपहरण करुन तिला अज्ञातस्थळी डांबून ठेवल्याने खळबळ उडाली. या तरुणीवर नराधमाने अत्याचार केल्यामुळे पीडिता गरोदर राहिली आहे. या तरुणीने कशीबशी नराधमाच्या तावडीतून सुटका करुन घेत घर गाठले. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीवरुन परतवाडा पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीचे 22 सप्टेंबरला अपहरण झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली होती. अखेर पीडित तरुणी 14 डिसेंबरला आपल्या गावी परतली आहे. मात्र पीडितेची प्रकृती बरी नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याचा प्रकार उघड झाला.
पीडिता परतल्याची पोलिसांना माहितीच नाही : घरी परतल्यावर ती आजारी पडल्यामुळे तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथून तिला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. रक्त तपासणी दरम्यान ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. या संपूर्ण प्रकाराबाबत त्या युतीचा जबाब घेऊन परतवाडा पोलिसांना पाठवण्यात आल्यानंतर या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी दिली. दरम्यान मुलगी परत आली यासंदर्भात तिच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार दिली होती तशी ती घरी परत आली या बाबत कुठलीही माहिती दिली नाही. सदर युवती गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तिचा जबाब नोंदविला. डॉक्टरांनी युवतीकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.सामाजिक बदनामी होऊ नये म्हणून पिडीतेने व तिच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.