अमरावती -कवठा बहाळे येथील रहिवासी अर्पिता ठाकरे आणि मलकापूर पांढरी येथे राहणाऱ्या तुषार मस्करे यांच्या प्रेमप्रकरणाला अर्पिताच्या कुटुंबीयांचा विरोध होता. यामुळे प्रियकर तुषारने तीची गळा चिरून निर्घृन हत्या केली. एवढेच नाही, तर त्याने तिच्यावर चाकूचे तब्बल १७ वार केले आहेत. ही घटना अमरावतीतील चुनाभट्टी ते मुधोळकरपेठ परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरातील युवकांनी तुषारला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
मुधोळकरपेठ परिसरात मंगळवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसोबत शिकवणीवरून परत येणाऱ्या अर्पितावर तुषारने चाकूने वार केला. मुधोळकरपेठ परिसरातील युवक तुषारला रोखण्यासाठी धावेपर्यंत त्याने अर्पिताच्या अंगावर चाकूने 17 वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्पिताला सागर बीजवे या युवकाने उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले तर काही युवकांनी तुषारला पकडून त्याला चांगला चोप देऊन राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.