अमरावती- सकाळच्या सुमारास कुणी मुली शाळेत जाताना दिसतात, तर कुणी घरकामात व्यस्त असतात. मात्र, अमरावीच्या मोर्शी बसस्थानकात सकाळीच एक मुलगी येते अन् जगण्यासाठी २ पैसे कमवण्याची तिची धडपड सुरू होते. माधुरी कुमरे असे त्या मुलीचे नाव. माधुरी सकाळीच बसस्थानकातून वृत्तपत्र घेऊन घरोघरी वाटण्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत असते.
मोर्शीच्या झोपडपट्टीत किरायाच्या घरात माधुरी राहते. माधुरीच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. राहायला हक्काचा निवारा नाही. आई हातमजुरी करते, तर वडील गवंडी काम करतात. दोन वेळची भाकर मिळण्याची सोय नाही. त्यामुळे माधुरीने काहीतरी काम करून घरी हातभार लावण्याचे ठरवले. आईवडिलांना मुलगा नाही. मात्र, मुलालाही लाजवेल असे काम माधुरी करते.