अमरावती- मेळघाटातील 50 पेक्षा अधिक गावात पाण्याच्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे 30 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईमुळे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली बालिका बादली ओढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली. त्यामुळे त्या बालिकेला जीव गमवावा लागला आहे. मनीषा धांडे असे त्या विहिरीत पडून मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. ही घटना चिखलदरा तालुक्यातील मोथा गावात घडली.
मनीषा विहिरीतून पाणी काढत असताना तिचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली. त्यानंतर ती गंभीर जखमी झाली. तिला नागपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी तिची झुंज अखेर संपली. एक हंडा पाण्यासाठी जीव गमवावा लागतो, त्या मेळघाटात पाणी टंचाई किती भीषण असेल याची प्रचिती येते.