अमरावती - कुपोषणग्रस्त भाग मेळघाटातील आदिवासी समाजाच्या 'घुंगळू हाटी' उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. जिल्ह्यातील धारणीच्या भरगच्च बाजारात शेकडो नागरिकांनी आदिवासी नृत्याचा आनंद घेत हा उत्सव साजरा केला.
मेळघाटातील आदिवासींच्या "घुंगळू हाटी" उत्सवाला प्रारंभ कुपोषणाची काळी किनार लागलेल्या अतिदुर्गम अशा मेळघाटातील आदिवासी बांधव आजही आपल्या सणाची, उत्सवाची परंपरा कायम राखतात. दिवाळी नंतर पहिल्याच आठवड्यातील बाजार म्हणजे आदिवासी बांधवांचा 'घुंगळू हाटी' हा उत्सव आहे. सध्या या उत्सवाला मेळघाटात प्रारंभ झाला आहे.
हेही वाचा -सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - सदाभाऊ खोत
काय आहे घुंगळू हाटी उत्सव?
आदिवासी समाजात होळीच्या सणाचे ज्याप्रमाणे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे दिवाळी नंतर येणाऱ्या घुंगळू हाटी उत्सवाला महत्त्व आहे. यामध्ये आदिवासी बांधव आकर्षक असा पोशाख परिधान करतात. डोक्यावर तुई, मुखात मोठी सुरेल आवाज काढणारी बासुरी, ढोल ताशांच्या गजरात तालुक्यातील प्रमुख आठवडी बाजाराच्या दिवशी मोठया उत्साहात हा उत्सव आदिवासी बांधव साजरा करतात. 2 आठवडे हा उत्सव साजरा करण्यात येतो. आदिवासी नृत्य करत असताना अनेक लोक पैसे देतात. मग त्या गोळा झालेल्या पैशातून आदिवासी बांधव पार्टी करतात.