महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अघोरी उपचारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करा; यशोमती ठाकूर यांचे निर्देश

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील बोरथा येथील गावातील एका चिमुकल्यास पोटफुगी झाली होती. मात्र त्या आठ महिन्याच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात न नेता भगताकडे नेले. भगताने सांगितल्याप्रमाणे पालकांनी मुलाच्या पोटावर चटके दिले. या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

yashomati thakur
यशोमती ठाकूर रुग्णालयात बाळाची चौकशी करताना

By

Published : Jun 21, 2020, 10:33 AM IST

अमरावती- मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात पोटफुगी झालेल्या चिमुकल्या मुलांना गरम विळ्याचे चटके दिल्याचा अघोरी प्रकार समोर आला होता. या घटनेतील एका ८ महिन्याच्या पीडित मुलावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच शनिवारी महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयास भेट देऊन त्या मुलाच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच या अघोरी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले आहेत.

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरथा येथील गावात या चिमुकल्यास पोटफुगी झाली होती. मात्र या आठ महिन्याच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात न नेता भगत भूमकाकडे नेले. भगताने सांगितल्याप्रमाणे पालकांनी मुलाच्या पोटावर चटके दिले. या घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांकडून बालकावर उपचार करणारी दाई व बालकाच्या वडिलास अटक केली आहे.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, की चिखलदरा तालुक्यात घडलेली ही घटना अत्यंत वाईट असून, मेळघाटात सक्षम आरोग्य यंत्रणेसह प्रबोधनाची गरज दर्शविणारी आहे. त्यामुळे येथे काम करताना आरोग्य, ग्रामविकास, वन, पोलीस, महसूल अशा विविध विभागांच्या समन्वयाने सातत्यपूर्ण प्रबोधन मोहिम चालविणे आवश्यक आहे. ग्रामपातळीवर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश करून सर्वंकष मोहिम राबवावी. स्थानिक बोलीत जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबवावेत.

आरोग्य यंत्रणा, महसूल, ग्रामविकास, कृषी यंत्रणांच्या ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यापुढे असे प्रकार घडता कामा नयेत. जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन अशा प्रकारांना तत्काळ आळा घालण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details