अमरावती - तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे आज (दि. 28 मार्च) पहाटे अल्पभूधारक शेतमजूर कुटुंबाच्या राहत्या घरात अचानक सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घराशेजारी असलेल्या पाण्याच्या हौदाच्या साहायाने नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
नेहमीप्रमाणे तळेगाव ठाकूर येथील शेतकामात काबाडकष्ट करणारे प्रशांत प्रभुजी गोमासे हे मजूर कुटुंबीय पहाटे 4 वाजेच्या सुमारास उठले आणि गॅस सुरू करताच अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. नागरिक झोपेत असतानाच अचानक स्फोटाच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली व सर्वजण पेट घेतलेल्या गोमासे यांच्या घराच्या दिशेने पळत सुटले. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले होते.