अमरावती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील आश्रमातून महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमपर्यंतच्या गांधी संकल्प पदयात्रेला आज(बुधवार) सुरुवात झाली. ४ रात्र आणि ५ दिवस असा हा प्रवास सुरू राहणार असून राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी हिरवा झेंडा दाखवला.
देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील कर्मभूमीतून गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी 'राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता' ही 'गांधी संकल्प पदयात्रा' आज(बुधवार)पासून सुरू झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन या पदयात्रेची सुरुवात झाली असून याचा समारोप वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे होणार आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तर केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. या पदयात्रेचा प्रवास हा ४ रात्र आणि ५ दिवसांचा असणार आहे.