अमरावती- चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहणाऱ्या गणेश हेकडे या कुस्तीपटूने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह चिखलदरा येथील भीमकुंडात आत्महत्या केली होती. दरम्यान, या घटनेतील मृत गणेश याचे मृतदेह बाहेर काढण्यात एसडीआरएफच्या पथकाला अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान, अथक प्रयत्नानंतरही गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. त्यामुळे अखेर आज दुपारी कुटुंबाच्या उपस्थितीत दरीवरूनच मृत गणेश हेकडेवर अंतिम संस्कार करण्यात आले.
गणेश हेकडे हा २६ वर्षीय कुस्तीपटू अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहत होता. दरम्यान, १ मे रोजी त्याने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह चिखलदरा येथील २ हजार फूट खोल दरी असलेल्या भीमकुंडात आत्महत्या केली होती. या घटनेच्या ५८ तासानंतर मुंबईवरून आलेल्या एसडीआरएफच्या पथकाला शुक्रवारी रात्री ८ वाजता पत्नीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. परंतु पतीचा मृतदेह दरीतच पडून अडकला होता. गणेशच्या मृतदेहाजवळ आग्या मोहाच्या मधमाशाचे मोठे पोळे असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अपयश येत होते. दरम्यान, या पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नाही.