अमरावती -चार दिवसांपूर्वी कोरोनासदृश्य लक्षणे दिसत असल्यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या परप्रांतीय वाहन चालकाचा मृत्यू झाला. आज शहरातील हिंदू स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याची पत्नी, दोन मुली, पत्नीचा भाऊ आणि चुलत भाऊ उपस्थित होते.
कोरोनासदृश्य लक्षणे आढळलेल्या परप्रांतीयाचा मृत्यू, अमरावतीमध्ये आज अंत्यसंस्कार - महाराष्ट्र कोरोना अपडेट
उत्तरप्रदेशातील एकजण समृद्धी महामार्गाच्या कामासाठी धामणगाव येथे चालक म्हणून काम करत होता. तो 13 एप्रिलला आजारी असल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याच्यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्याने त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 15 एप्रिलला त्याचा मृत्यू झाला.
मृत व्यक्ती समृद्धी महामार्गाच्या कामासाठी धामणगाव येथे चालक म्हणून काम करत होता. तो 13 एप्रिलला आजारी असल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याच्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 15 एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. हा व्यक्ती मूळचा उत्तर प्रदेशातील असल्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाचा शोध घेतला. मृताची पत्नी गुजरातमध्ये मजुरीवर होती. तिच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात येणाऱ्या महादेवरी गावातील त्याच्या चुलत भावालाही माहिती दिली.
आज बुधवारी मृत व्यक्तीची पत्नी, दोन मुली, चुलत भाऊ आणि एक अन्य नातेवाईक, असे पाच जण अमरावतीत आले. मृताच्या कुटुंबीयांनी आम्हाला मृतदेह सोपवावा, अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाने मृतदेहाचा चेहरा सुद्धा पाहू दिला जाणार नाही, असे मृताच्या कुटुंबीयांना बजावले. अखेर मृताच्या मूळ गावातील लोकांनी भ्रमणध्वनीद्वारे मृताच्या पत्नीची समजूत काढल्यावर मृतदेह हिंदू स्मशानभूमीत आणण्यात आला. याठिकाणी शवदाहिनीमध्ये मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर मृताच्या अस्थी कुटुंबीयांना सोपविण्यात आल्या. तसेच गुरुवारी विशेष पास देऊन त्यांना उत्तरप्रदेशात पाठवण्यात येणार आहे.