अमरावती - एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर महाजनादेश यात्रा काढून जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपासून होणार आहे. या यात्रेच्या उद्घाटानाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी दिली.
अमरावतीच्या मोझरीतून होणार भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'ला सुरुवात, अमित शाह राहणार उपस्थित - देवेंद्र फडणवीस
एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर महाजनादेश यात्रा काढून जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपासून होणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढली. आता भाजपही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात महाजनादेश यात्रा काढणार आहे. ५ वर्षात भाजप सरकारने केलेली कामगिरी, जनतेसाठी राबवलेल्या योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांसाठी राबविलेल्या योजना, याचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महाजनादेश यात्रा राज्यभर जाणार आहे. २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी ही भाजपची महाजनादेश यात्रा आहे.
प्रचाराचे नारळ फुटले नसले तरी भाजपने या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून एकप्रकारे प्रचाराला सूरुवात केल्याचे बोलले जात आहे. या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ३० जिल्हे आणि १५२ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. अमरावतीच्या मोझरीतुन सुरू होणाऱ्या या महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील व राज्यांतील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.