अमरावती -शहरालगत कठोरा परिसरात असणाऱ्या पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणाऱ्या चार जणांना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे ( Deaths Due Electric Shock in Amravati ) ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा महाविद्यालय परिसरात पोहोचला असून अग्निशामक दलही महाविद्यालयात पोहोचले आहे. चारही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
कॉलेजमधील शिपायांनाच कामाला लावले -
या दुर्देवी घटनेत अक्षय सावरकर (वय 26), प्रशांत शेलोरकर (वय 31), संजय दंडनाईक (वय 45) आणि गोकुळ वाघ (वय 29) असे या चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते चौघेही याच कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारीच कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी लावल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रंगरंगोटी करण्यासाठी लोखंडी शिडीवर सर्वजण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का शिडीला लागला. याचवेळी हे चारही जणांना जोरदार शॉक लागला. त्यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.