अमरावती- दोन दिवसांत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील दत्तवाडी परिसरातील 40 कोंबड्या दगावल्या. सद्यस्थितीत बर्ड फ्लूची धास्ती नागरिकांमध्ये असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्या मृत कोंबड्यांचे स्वॅब अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती आहे.
दोन दिवसात 40 कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती बडनेरा शहरातील जुन्या वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण 28 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अचानक जमिनीवर कोसळून त्या कोंबड्या गतप्राण झाल्या. योगेश निमकर, बाळू ठवकर यांनी बडनेरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला याची माहिती दिली.
दुषित पाण्यामुळे कोंबड्या दगावल्याचा कयास
डॉक्टरांनी तातडीने घटनास्थळी मदतनीस पाठवून कोंबड्यांच्या नाकावाटे व गुदद्वारातून स्वॅब घेण्यास सांगितले. हे नमुने अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविले असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मात्र, अचानकपणे दगावलेल्या त्या 28 कोंबड्यांनी पांढरी शौच केल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले. दूषित पाणी प्यायल्यानेही पांढरी शौच येऊ शकते, असा कयास कोंबडीपालकांनी व्यक्त केला. तथापि, बर्ड फ्लूचा धोका काही राज्यांत बळावल्यावरून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा -चांदुर रेल्वे रस्त्यावर वर्षभरात 19 अपघातात 11 जण ठार
हेही वाचा -भरधाव वाळू ट्रकची आयशर ट्रकला धडक; सुदैवाने जिवितहानी नाही