अमरावती- धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांची गर्दी होत आहे. त्यातच मंगळवारी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी देखील अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. घुईखेडकर यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला मोठे भगदाड पडले असून याचा फटका विद्यमान काँग्रेसच्या आमदारांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून मूळचे काँग्रेसचे असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी नामांकन अर्ज उचलला होता. ते अपक्ष निवडणूक लढणार असून त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी चांदूर रेल्वेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केले. त्यापूर्वी घुईखेडकर यांची चांदूर रेल्वे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास संताबाई यादव मंगल कार्यालयापासून अमरावती रोडमार्गे क्रांती चौक होत चंद्रशेखर आझाद चौकात पोहचली. तेथून रॅली जुना बस स्टॅन्डकडे आली व दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहचली.