अमरावती- शहरात कोरोना चाचणीच्या दोन प्रयोगशाळा येणार होत्या. जनप्रतिनिधींनी या प्रयोगशाळेचे काय केले, असा प्रश्न माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे. परिस्थिती कठीण आहे. या परिस्थितीत श्रेय मिळविण्याचा विचार केल्यापेक्षा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
कोरोना चाचणी प्रयोगशाळांचे काय झाले? माजी राज्यमंत्र्यांचा उद्विग्न सवाल
अमरावतीत एक नव्हे तर दोन कोरोना चाचणी प्रयोगशाळा होणार याबाबत मोठा गवगवा करण्यात आला. वास्तवात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविदयलाय असो किंवा अमरावती विद्यापीठ असो कुठेही कोरोना चाचणी प्रयोगशाळा अद्यापही सुरू झालेली नाही.
कोरोना चाचणी अहवाल त्वरित यावा यासाठी अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा येणार याबाबत अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. मात्र, या प्रयोगशाळेबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. याबाबत डॉ. सुनील देशमुख यांनी आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना खंत व्यक्त केली.
केंद्र आणि राज्य शासनाचे आदेश, महापालिकेची नियमावली यांचे पालन अमरावतीकर जनता करीत असताना आपल्या भविष्यातील सुरक्षेचे काय, आपल्याकडे उशिरा येणाऱ्या कोरोना चाचणीमुळे कोरोना पसरण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत आपली चूक काय, असा प्रश्न नागरिकांना साहजिकच पडू शकतो. अमरावतीत एक नव्हे तर दोन कोरोना चाचणी प्रयोगशाळा होणार याबाबत मोठा गवगवा करण्यात आला. वास्तवात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविदयलाय असो किंवा अमरावती विद्यापीठ असो कुठेही कोरोना चाचणी प्रयोगशाळा अद्यापही सुरू झालेली नाही. नागपूरला तिथल्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील उपकरणे एम्स रुग्णालयात हलवून तपासणी केली जात आहे. आपल्याकडे फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे कोणीही कुठली मागणी केली नाही. आज जास्तीत जास्त तापासण्या झाल्या तर हा आजार आटोक्यात होण्यास मदत होईल आणि यामुळेच अमरावतीत कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा त्वरित होणे आवश्यक, असल्याचे डॉ. सुनील देशमुख म्हणाले.