अमरावती- जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींना 'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. सद्यपरिस्थितीत मुलींवर होणारे अत्याचार, अॅसीड हल्ले पाहता शिक्षकांकडून मुलींना ही शपथ देण्यात आली होती. याबाबत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून मुलींऐवजी मुलांनीच शपथ घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अॅसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने मुलींकडे बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार, असे ट्विट त्यांनी या घटनेसंदर्भात केले आहे. त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत, शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. शपथ मुलींनाच का? आणि तीही प्रेम न करण्याची?