अमरावती -मुख्यमंत्र्यांच्या सभेत नेत्यांसोबत आपला फोटो यावा यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना चांगलाच आटापिटा करावा लागला. फोटो काढण्यासाठी प्रवीण पोटे यांनी केलेला प्रयत्न अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि या प्रसंगाचा फोटो अन् व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोटेंची चांगलीच चर्चा रंगली आहे.
VIDEO...जेव्हा प्रवीण पोटे फोटो काढण्यासाठी करतात आटापिटा - मुख्यमंत्र्यांच्या सभेत प्रविण पोटे
अमरावतीमधील दर्यापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना फोटो काढण्यासाठी चांगलाच आटापिटा करावा लागला.
जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर झाली. यावेळी दर्यापूर येथे सभामंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. त्यावेळी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आमदार रमेश बुंदेले यांच्यासह आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि अमरावतीच्या माजी महापौर किरण महल्ले हे सर्व उपस्थित जनतेला अभिवादन करीत होते. मात्र, याचवेळी दिनेश सूर्यवंशी यांच्या मागे उभे असणारे प्रवीण पोटे हे कॅमेरा येत नव्हते. त्यामुळे त्यांनी चक्क दिनेश सूर्यवंशी आणि प्रकाश भारसाकळे यांच्यामधून आपला चेहरा बाहेर काढला. हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला अन् पाहता पाहता या क्षणाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहिल्यावर माजी पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांसोबत झळकण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो? याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.