अमरावती -मेळघाटातील अतिदुर्गम धुळघाट येथील वन विश्रामगृहाच्या वनकुटीला राज्याचे मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते 'दीपाली कुटी' असे नामकरण करण्यात आले. 25 मार्च 2021 रोजी दीपाली चव्हाण यांनी हरिसाल येथे गोळी झाडून आत्महत्या केली होती. मूळच्या सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या दीपाली चव्हाण यांना वनखत्यात पहिली पोस्टिंग धुळघाटला मिळाली होती. यामुळे त्यांच्या स्मृती आता 'दीपाली कुटी' म्हणून मेळघाटात कायमस्वरुपी जपल्या जाणार आहेत.
अतिदुर्गम भागात कर्मचाऱ्यांना सुविधा पोचवा -अतिदुर्गम भागात वनांचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम करावे लागतात. दुर्गम भागात या कर्मचाऱ्यांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांनी मेळघाट दौऱ्या दरम्यान दिले आहेत.
कोहा नाक्याचे केले उद्घाटन -मेळघाट दौऱ्यात सुनील लिमये यांनी व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणांना भेटी दिल्या व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. गुगामल वन्यजीव विभागातील कोहा नाक्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एसटीपीएफ कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
अवैध चाराईवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षक कुटी -धूळघाट वन्यजीव परिक्षेत्रात चिचाथावडा येथे वनसंरक्षक कुटीचे उद्घाटन लिमये यांच्या हस्ते झाले. ही संरक्षक कुटी महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. सालई झाडाचा गोंद काढण्यासाठी होणारे अवैध धंदे व अवैध चराई रोखण्यासाठी ही कुटी महत्वपूर्ण आहे. अकोट आणि गुगामल वन्यजीव विभागातील अतिदुर्गम भागातील कोकरजांबू व गुगामल संरक्षक कुटींनाही प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी भेट दिली. अतिदुर्गम भागातील वनकर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे आदेश त्यांनी दिले.
वणवा नियंत्रण करणाऱ्यांचा सत्कार -धारगड वनपरिक्षेत्र मुख्यालयालाही सुनील लिमये यांनी भेट दिली. वणवा नियंत्रण व वनसंरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोजंदारी वनमजूर, वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांचा गौरव यावेळी सुनील लिमये यांच्या हस्ते झाला. यावेळी वनकामगार व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, धूळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर, विभागीय वनाधिकारी नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक इंद्रजीत निकम, विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार आदी विविध अधिकारी दौऱ्यादरम्यान उपस्थित होते.