अमरावती:पोहरा आणि चारोळीच्या जंगल परिसरात सावंगा विठोबा हे गाव वसले आहे. या ठिकाणी अवधूत महाराजांचे तटबंदी वाड्याच्या आतमध्ये अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे. या मंदिरात कुठलीही मूर्ती नाही. मात्र अवधूत महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. यासह अनेक काळापासून या ठिकाणी अखंड ज्योत तेवत आहे. या ठिकाणी मूर्तीपूजेला स्थान देण्यात आले नाही. कृष्णाजी अवधूत महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला डोक्यावर रुमाल बांधावा लागतो किंवा टोपी घालावी लागते. या ठिकाणी अवधूती भजन सकाळी आणि सायंकाळी गायले जाते. कृष्णाजी अवधूत महाराज नवसाला पावतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा भाविकांची आहे.
कापूर पेटविण्याला महत्त्व :कृष्णाजी अवधूत महाराजांच्या या मंदिरासमोर 73 फूट उंचीचे दोन खांब उभे आहेत. या खांबांना जीवा-शिवाची जोडी असे म्हटले जाते. तर काही भाविकांच्या मते या दोन पैकी एक खांब म्हणजे कृष्णाजी अवधूत महाराज असून दुसरा खांब म्हणजे त्यांचा शिष्य असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही खांबाजवळ कापूर पेटविण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो. गुढीपाडव्याच्या पर्वावर हजारो किलोचा कापूर या ठिकाणी भाविक पेटवतात. कापुराप्रमाणेच विड्याच्या पानाला देखील महत्त्व आहे. या ठिकाणी विड्याचे पान हे प्रसाद स्वरूपात ग्रहण केले जाते.
गुढीपाडव्याला चढविल्या जातात झेंडे:कृष्णाजी अवधूत महाराज मंदिरासमोर असणाऱ्या 73 फूट उंच खांबावर गुढीपाडव्याच्या पर्वावर झेंडे चढविले जातात. गत आठ वर्षांपासून चरणदास कांडलकर ही व्यक्ती झेंडे चळवित आहेत. अवधूत महाराज आणि त्यांच्या सेवकांचे प्रतीक असणाऱ्या या दोन्ही थांबाना पाय लागू न देता एकाच वेळी या खांबांवरचे जुने कापड काढणे आणि नवीन चढविण्याची प्रथा सुमारे सातशे वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही 73 फूट झेंड्यांना दोरखंड बांधून त्या दोरावरून चरणदास कांडलकर हे वर चढतात. दोन तासांच्या या चित्तथरारक कसरतीद्वारे चरणदास कांडलकर हे दोन्ही खांबावरील जुनी खोड काढतात आणि त्याच वेळी नवीन खोळ चढवितात. झेंडे चढविण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी पाच ते सहा लाख लोकांची गर्दी मंदिर परिसरात होते. या सोहळ्या दरम्यान वाद्यांच्या प्रचंड गजरात अवधुती भजन म्हटले जाते.