अमरावती - गेल्या तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पारा ४६ डिग्रीच्या वर गेला आहे. आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील मुरादेवी येथे अचानक आग लागली. या आगीत 5 घरे जळून खाक झाली आहेत, तर गोठ्यात बांधलेले ३ बैल, १ म्हैस, बोकड जळून जागीच ठार झाले. यामध्ये नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातील मुरादेवीत भीषण आग; 5 घरे जळून खाक, पाच जनावरे दगावली
आगीत पाच घरे जळून खाक झाली आहेत, तर गोठ्यात बांधलेले ३ बैल, १ म्हैस, बोकड जळून जागीच ठार झाले. यामध्ये नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दूपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये अ.सलीम शे.नजीर, यांच्या घराच्या बाजूला असलेल्या शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदिर शे. बशीर यांच्या घराला सुद्धा आग लागली. आग अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विझवण्यासाठी सर्वप्रथम गावातील नागरिकांनी मोठी धावपळ केली. त्यानंतर दर्यापूर, अकोट अचलपूर, येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत चारही घरे जळून खाक होऊन यात जीवनावश्यक वस्तू सह शेतीचे साहित्य जळून खाक झाले व जनावरेसुद्धा मृत्युमुखी पडली.
दरम्यान, आगीत 5 घरे जळून खाक झाली आहेत. आता त्या कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. अंजनगाव सुर्जी येथे एकही अग्निशमक नसल्यामुळे ही आग विझवण्यासाठी वेळ लागली. त्यामुळे आमदारांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी अग्निशामक वाहन उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून भविष्यामध्ये अशाप्रकारची घटना घडली तर त्यावर तातडीने नियंत्रण येईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.