अमरावती : अमरावती शहराच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून आरती सिंह या बुधवारी रुजू झाल्या. अमरावतीचे माजी पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्याकडून आरती सिंह यांनी पदभार स्वीकारला. यानंतर पोलीस आयुक्त म्हणून आरती सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बनारस येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून एमबीबीएस झाल्यावर स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम करताना मुलींचा जन्म होणे हे मोठे पाप असल्याचा गैरसमज समाजात असल्याचा अनुभव मला वारंवार यायचा. मुलीला जन्म देणाऱ्या माता अक्षरशः घाबरून जायच्या. मुलगी झाली आता घरचे मला वागवणार नाही, अशी भीती महिलांमध्ये मी पहिली आहे. ही वाईट परिस्थिती पाहता मुलींना सन्मान मिळावा या उद्देशाने मी आयपीएस झाले. आज महिला म्हणून पोलीस आयुक्त पदावर मी आले असल्याचे आरती सिंह म्हणल्या.
पोलीस खात्यात रुजू होताच पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मिळाली. पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीत केलेल्या खडतर सेवेबाबत विशेष पुरस्कार मिळाला असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले. गडचिरोलीनंतर भंडारा पोलीस अधीक्षक, नागपूर पोलीस अधीक्षक, नागपूर सीआयडी पोलीस अधीक्षक अशी आठ वर्षांची सेवा विदर्भात झाली असून औरंगाबाद आणि नाशिक येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यावर पुन्हा आता विदर्भात तेही पश्चिम विदर्भाची राजधानी असणाऱ्या अमरावतीला आली आहे.