अमरावती - जिल्ह्यातील वरुड तालुक्याच्या राजुराबाजार येथे अचानक आग लागुन एका घरासह लगतच्या जनावरांचे दोन गोठे सुध्दा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही.
वरूड तालुक्याच्या राजुराबाजार गावातील रामनगर परिसरातील जयकुमार साबळे यांच्या घरातील सर्व सदस्य बाहेर असतांना ही आग लागली. या आगीमध्ये घरातील सर्व अन्न धान्य, कपडे, कागदपत्रे, शेतमाल व 50 हजार रु रोख असे सर्व जळून राख झाले. या आगीत गायीचे दोन गोठे जळून राख झाले. मात्र जनावरे बाहेर काढल्यामुळे ती वाचली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आली.