अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या लाकूड बाजाराला मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत बाजार पेठेतील ७ ते ८ लाकूड साहित्याची दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच अचलपूर नगरपरिषद, चांदूर बाजार नगरपरिषद व दर्यापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.
अमरावतीच्या परतवाडा शहरात मोठी लाकूड बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत लाकूड साहित्य (फर्निचर) मोठ्या प्रमाणावर बनवले जाते. सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू असल्याने येथील व्यवसायिकांनी फर्निचरचे साहित्य मोठ्या प्रमाणावर बनवून ठेवले होते. पण, काल मध्यरात्री दीडच्या सुमारास या बाजारपेठेत अचानक आग लागली. त्यामुळे लाखो रुपये किंमतीचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अचलपूर, चांदूर बाजार व दर्यापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. तर, याआधी सुद्धा येथील लाकूड बाजारात अशाच प्रकारे आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परत परत अशा घटना होऊ नये याकरता प्रयत्न केले जातील का, नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.