अमरावती -जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या पाळा येथील शिव बायोकेम या रासायनिक कारखान्याला अचानक आग लागली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र ही आग लवकरच आटोक्यात आल्याने मोठ्या अनर्थ टळला.
कारखान्यात स्फोट झाल्याने खळबळ
पाळा येथील शिव बायोकेम या कारखान्यात विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ आहेत. या कारखान्यात दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने खळबळ उडाली. कारखान्याचे संचालक पवन डेंबला यांनी घटनेची माहिती अमरावती महापालिकेच्या अग्निशमन दलासह चांदुर रेल्वे अग्निशमन दलाही दिली. अमरावती महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी पोहचले आणि त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अमरावतीवरून तसेच चांदुर रेल्वेवरून येणाऱ्या अग्निशमन दलाच्या इतर वाहनांना घटनास्थळी येऊ नये, असे सूचित करण्यात आले.
माहिती देण्यास नकार
पाळा येथील शिव बायोकेम या रासायनिक कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पत्रकारांना आगीसंदर्भात कुठलीही माहिती देण्यास कारखान्याच्या संचालकांनी नकार दिला. अग्निशमन दलाच्यावतीने सांगण्यात आले की कारखान्यात मोठा स्फोट झाल्याने आग ही लागली. अग्निशमन दलाने ही आग वेळेत आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
एमआयडीसीतील आग नियंत्रणात
अमरावती एमआयडीसी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री नॅशनल पेट्रीसाईज अँड केमिकल या कारखान्याला लागलेली आग रविवारी सायंकाळी आरोक्यता आली. या कारखान्याला लागलेली आग भीषण असल्याने पाळा येथील शिव बायोकेम या रासायनिक कारखान्याला आग लागल्याची घटना घडताच प्रशासन तातडीने कामाला लागले होते. मात्र आग लवकरच आटोक्यात आल्याने प्रशासनाचा ताण कमी झाला.
हेही वाचा -चेंबूर चिल्ड्रन होममधील 18 मुले कोरोना पॉझिटिव्ह