अमरावती - जिल्ह्यातील अचलपूरमधल्या फिनले मिलच्या कामगारांनी कंपनीच्या बॉयलरच्या चिमनीवर शोले स्टाईल आंदोलन केले आहे. कामगारांना पूर्ण वेतन मिळत नसल्याने निषेध करत कामगारांच्या पूर्ण वेतनासह इतर अनेक मागण्या मान्य करण्यासाठी गिरणी कामगारांनी हे लक्षवेधी आंदोलन केले. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत चिमनीवरून खाली न उतरण्याचा निर्णय या आंदोलक कामगारांनी घेतला आहे.
अमरावतीच्या अचलपूर मध्ये असणाऱ्या फिनले मिलमध्ये कामगारांवर अनेक दिवसांपासून अन्याय होत असल्याची ओरड या कामगारांकडून केली जात आहे. एकीकडे अधिकाऱ्यांना पूर्ण पगार मिळत असताना कामगारांना केवळ पाच हजार रुपये पगार दिला जात असल्याचा आरोप या गिरणी कामगार संघाने केला आहे. त्यासाठी या कामगारांनी वारंवार पाठपुरावा देखील केला. मात्र मिल व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारे या कामगारांच्या मागणीकडे दाद दिली नाही. त्याच पार्श्वभूमीवर सोमवापी पहाटे संतप्त झालेल्या गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष अभय माथने, राजेश ठाकूर, धर्मा राऊत अस अन्य पदाधिकाऱ्यांनी फिनले मिलच्या बॉयलर चिमणीवर चढुन फिनले मिलच्या व्यवस्थापना विरोधात आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.