अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सतत लांबणीवर जाणारी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अखेर उद्यापासून सुरू होणार आहे. सर्व शाखेच्या अंतिम वर्षाचे एकूण 1 लाख 35 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहे. कोरोनामुळे अनेक अडथळ्यांचा सामना करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला आता परीक्षा घेण्यासाठी 20 ऑक्टोबरचा मुहूर्त सापडला आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबरपासून परीक्षा होणार होती; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षा सुरू होण्याच्या 12 तास आधी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा रद्द झाली होती.
मुहूर्त सापडला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा उद्यापासून - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
कोरोनामुळे अनेक अडथळ्यांचा सामना करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी 20 ऑक्टोबरचा मुहूर्त सापडला आहे. सर्व शाखेच्या अंतिम वर्षाचे एकूण 1 लाख 35 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
आता उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेबाबत परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली. 20 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा 8 नोव्हेंबरला संपणार आहे. एकूण 1 लाख 35 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यापैकी 5 हजर 500 विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देण्यास तयार नसल्याने त्यांची लेखी परीक्षा विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या 386 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत ज्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर पोहोचेल, त्याला त्या त्या केंद्रांवर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. इतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी दीड तासाचा वेळ दिला जाणार आहे. 1987, 1990, 1995 या वर्षातील काही विद्यार्थ्यांनी यावर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षेचे अर्ज भरले आहेत. या अल्पशा प्रमाणात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हॅट्सअॅप क्रमांकावर तसेच ई-मेलवर प्रश्नपत्रिका पाठविली जाणार आहे. त्यांनी उत्तरपत्रिका सोडविल्यावर त्या विद्यापीठाच्यावतीने स्वतंत्रपणे दिल्या जाणाऱ्या व्हॅट्सअॅप क्रमांकवर ही उत्तरपत्रिका परीक्षा होताच पाठवावी लागणार आहे. हे सर्व निकाल 30 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे डॉ. हेमंत देशमुख म्हणाले.