अमरावती- मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करीत धावत्या बसमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. परतवाडा ते धारणी हा प्रवास राज्य परिवहन महामंडळच्या बसने केल्याचा दावा करणाऱ्या राणा दाम्पत्याने हरिसल ते चित्री या १० कि.मी अंतरदरम्यानचाच प्रवास केला. हा सारा प्रकार नेहमीप्रमाणे नौटंकी आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी दोन दिवसापूर्वी मेळघाटात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास केला होता. या प्रवासाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून मेळघाटात धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या खराब गाड्या मेळघाटात पाठवल्या जात असल्याचा आरोप राज्य शासनावर केला होता. यावर, मुख्यमंत्र्यांनी घरात बसून राहू नये, तर घराबाहेर पडून लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या, अशी टीका राणा दामपत्याने केली होती.