अमरावती -निसर्गाचा लहरीपणा आणि परतीच्या पावसाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता जगायचे तरी कसे, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतात रोप लावण्यापासून त्याची वाढ आणि कापणीपर्यंत लागणाऱ्या खर्चाचा विचार केल्यास शेतकऱ्यांची दैना आपल्या लक्षात येईल. अशाच एका नुकसानग्रस्त युवा शेतकऱ्याच्या शेतीतील नुकसानीची परिस्थिती सांगणारा हा रिपोर्ट.
जिल्ह्यातील मोझरी गावातील सुयोग बानाईत असे या तरुण शेतकऱ्याचे नाव. तो सध्या बीकॉमच्या अंतिम वर्षात शिकत आहे. त्याचे वडील हे जिल्हा रुग्णालयातील पंचकर्म विभागात कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून ते कोविड रुग्णालयात सेवा देत आहेत. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच सुयोगच्या खांद्यावर शेतीचा भार आला. पण, निसर्गानं मात्र होत्याच नव्हतं केलं. सुयोगने सुरुवातीला ३५ किलो सोयाबीन बियाणं पेरलं पण ते उगवलेच नाही. नंतर पुन्हा बियाणं पेरलं त्याची मशागत केली. मात्र, परतीच्या पावसानं सोयाबीन बरोबरच सुयोगच्या स्वप्नावरही पाणी फेरले. एक एकरातील सोयाबीनला सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत १४ हजार रुपयांचे कर्ज काढून खर्च केले. मात्र, उत्पादन किती तर केवळ ७० किलो सोयाबीन... ज्याचे भाव दोन हजार रुपयेसुद्धा येणे कठिण आहे. ही परिस्थिती एकट्या सुयोगची नाही तर राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांची यापेक्षाही भीषण परिस्थिती यंदा परतीच्या पावसाने केली आहे. एकट्या पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील ३२ लाख हेक्टरपैकी सव्वा तीन लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे जून ते सप्टेंबर महिन्यात नुकसान झाले आहे.