अमरावती- निसर्ग असमतोलपणाच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे भंगत आहे. तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा उच्छाद वाढत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी तिवसा किसान सभेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
शेताला ताराचे कुंपण करण्यासाठी शंभर टक्के अनुदान द्या, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान पीक विम्यामध्ये समाविष्ट करा, वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानाचे १०० टक्के भरपाई द्या, आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
संत्रा बागेतील नुकसानासाठी प्रतिहेक्टर २.५० लक्ष नुकसान भरपाई द्या, तसेच सोयाबीन, तूर,कापूस आदी पिकास नुकसान भरपाई मदत द्या, वन्यप्राण्यांच्या उच्छादाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार करताना अटी रद्द करा, नुकसान भरपाई दहा दिवसात द्या, यावर्षी पडलेल्या पाण्याच्या दुष्काळाने नुकसान झालेल्या संत्रा व फळबाग शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसान भरपाई द्या, शेतकरी सन्मान योजनेतील रक्कम तातडीने द्या, आदी मागण्यांसाठी बाजार चौकापासून हा मोर्चा तिवसा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार दत्ता पंधरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.