अमरावती- अलीकडेच आपण एका मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रकार पाहिला आहे. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गात आता शेतकऱ्यांच्या जमिनी चोरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च महिन्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रामनाथ कंटाळे या 65 वर्षीय शेतकऱ्याचे शेत समृद्धी महामार्गात चोरी गेल्याची तक्रार त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. ती घटना ताजी असतानाच धामणगाव रेल्वेमधीलही रामआश्रय रामप्रसाद भगत या शेतकऱ्याचे शेत चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येण्याऐवजी शेतकऱ्यांची डोकेदुखीच जास्त वाढत असल्याचे समोर आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील रामआश्रय भगत या शेतकऱ्याकडे आसेगाव परिसरात एकूण १ हेक्टर २१ आर इतकी ओलिताची शेतजमीन होती. त्यामध्ये संत्रा, लिंबू, मोसंबी आशी फळबाग होती. शेताच्या सिंचनासाठी त्यात विहीर सुद्धा होती. समृद्धी महामार्ग हा अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांतून गेला आहे. अशातच भगत यांचे १ हेक्टर २१ आर इतक्या शेताच्या क्षेत्रफळांपैकी समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी त्यांचे १ हेक्टर ०५ आर क्षेत्रफळ शेत अधिग्रहित करण्यात आले होते. त्याचा रितसर मोबदलाही त्यांना मिळाला. त्यानंतर उर्वरित ०.१६ आर शेत त्यांच्या सातबाऱ्यावर दाखवण्यात आले.