अमरावती: पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पाणी मिळेल. रब्बीसाठी देखील पाणी देऊ, असे वारंवार जाहीर केले. शेतकऱ्यांनी कपाशी, तुरीसाठी पाण्याची वाट बघितली. तसेच रब्बीच्या पिकांची देखील पेरणी केली. परंतु, त्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी पोहोचलेच नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्याची कुंडी देखील मिळाल्या नाही.
काही शेतकऱ्यांच्या शेतात जे आऊटलेट दिले ते सखल भागात दिले. सखल भागातून पाणी उंच भागावर कसे पोहोचेल असा सवाल शेतकऱ्यांनी मुख्य अभियंता यांना विचारला असता या सगळ्या प्रश्नावर अधिकारी अनुत्तर झाल्याने शेतकरी पाणी प्रश्नावर आक्रमक झाले. सदर विभागाच्या सुचनेनुसारच त्यांनी शेतात रब्बीची पेरणी केली. आज शेतकऱ्यांचे पीक पाण्यावाचून धोक्यात आहे. उपस्थित शेतकऱ्यांनी मुख्य अभियंत्याला १७ तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. शेतकरी १७ तारखेला मोझरी परिसरात मुक्काम आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.