अमरावती -विदर्भातील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेकऱ्यांचा ओघ वाढला आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांचा ८ टक्के आद्रता असलेला कापूस ५,५५0 रुपये हमीभावाने खरेदी केला जात आहे. अमरावती जिल्हा पणन महासंघाची ७ केंद्र आहेत.
अमरावतीत शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी
विदर्भातील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा ओघ वाढला आहे. या केंद्रावर ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५,५५० रुपये हमीभावाने खरेदी केला जात आहे.
शेतकऱ्यांनी यंदा खासगी बाजाराऐवजी शासकीय खरेदी केंद्रांवर गर्दी केली आहे. आतापर्यंत विदर्भात सुमारे ४ लाख ९८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात सीसीआयच्या खरेदीचा सर्वाधिक वाटा आहे. कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक हे हमीभाव देऊ शकत नाहीत. त्यामुळे खासगी बाजाराकडे शेतकरी फारसे फिरकलेले नाहीत. दुसरीकडे, पणन महासंघ तसेच सीसीआयकडून ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेल्या कापसाला ५ हजार ५५० रुपयांचा हमीभाव दिला जातो आहे. त्यानंतर प्रत्येक टक्क्यासाठी १ किलोप्रमाणे पैसे कापले जातात. १२ टक्के आर्द्रतेपर्यंतचा कापूस शासकीय यंत्रणा खरेदी करते. यावेळी ८ ते १२ टक्के आर्द्रतेसाठी सरासरी चार किलोंचे पैसे कापले जातात. ५ हजार ३३५ रुपयांचा दर १२ टक्के आर्द्रतेत मिळतो. विदर्भात कापूस पणन महामंडळाच्या २४ तर सीसीआयच्या ४७ खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी केला जात आहे. खासगी बाजारात कापसाचे कमाल दर ५३०० रुपयांवर आहेत.