महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 16, 2019, 3:29 PM IST

ETV Bharat / state

शासनाकडून शेतकऱ्याची थट्टा, अधिग्रहित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने अमरावतीतील शेतकऱ्याची आत्महत्या

अनिल यांच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती तर त्याने आत्महत्या केली नसती, असे मत त्यांच्या चुलत भावाने मांडले.

अनिल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावात लागले फलक

अमरावती - शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा दुसऱ्या टप्प्यातील मोबदला न मिळाल्याने एता शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

चौधरी (ता.नांदगाव खंडेश्वर, लोहागाव) यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या दालनात विष घेऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात पोलिसांनी त्यांना पकडले. पण विष घेतल्याने त्यांची प्रकृती खालावल्यामुळे पोलिसांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यानच शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

अनिल यांच्या आत्महत्येविषयी माहिती देताना गावकरी

आज' ईटीव्ही भारत'ने लोहगाव येथे अनिल चौधरी यांच्या घरी भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात अनिल चौधरी यांच्या आयुष्यबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

वयाच्या सातव्या वर्षी अनिल चौधरी यांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरवले. त्यांच्या दोन मोठ्या बहिणींचा आणि त्यांचा सांभाळ काका-काकूंनी केला. चौधरी यांचे एकत्र कुटुंब असल्याने अनिल चौधरी यांना मोठा आधार मिळाला. मात्र, २० वर्षांपूर्वी तलावासाठी शासनाने गावातील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली होती. त्यात चौधरी कुटुंबाचीही एकूण ३६ एकर जमीन गेली होती. अनिल चौधरी यांच्या हिश्यातील १० एकर जमीन शासनाने अधिग्रहित करून पहिल्या टप्प्यातील मोबदला त्यांना दिला. मात्र, दुसऱ्यातील टप्प्यातील मोबदला त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

शासनाने जमीन अधिग्रहित केल्यावर चौधरी यांच्याकडे १० एकर जमीन होती. चौधरी यांच्या लग्नानंतर त्यांना २ मुलींच्या पाठीवर १ मुलगा झाला. काही काळानंतर त्यांच्या पत्नीची मानसिक स्थिती बिघडली. त्यानंतर ती शक्यतो माहेरीच राहायची. अनिलच्या तिन्ही मुलांचा सांभाळ त्यांचे मावसभाऊ देवेंद्र चौधरी आणि त्यांच्या पत्नी करीत आहेत. अनिल चौधरी यांनी मोठी मुलगी सानिका यावर्षी दहावीला गेली तर वेदिका पाचवीला आणि मुलगा गौरव चौथीमध्ये शिक्षण घेत आहे.

अनिल चौधरी हे गावात शेती करत करत मावसभावाची गाडी चालवत होते. सकाळी ७ वाजता घराबाहेर पडल्यानंतर ते घरी दुपारी १ ते २ च्या सुमारास यायचे. दिवसभर कोणाच्याही अडचणीत धावून जाणे. रस्त्याने कोणाचा अपघात झाला तर अपघातग्रस्ताला अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेणे. उपचार पूर्ण होईस्तोवर त्याच्याजवळच राहणे आणि स्वतः जवळचे पैसेही रुग्णाच्या उपचारासाठी लावणे, आशा कामातच ते व्यस्त असायचे. त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या १० एकर शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची फेड करू न शकल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत होता, आशा दडपणात असताना शासनाने अधिग्रहित केलेल्या जमीनीचा पूर्ण मोबदला त्यांना मिळाला नाही. तसेच त्यांच्या जमिनीचे प्रकरण ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट होते. त्या जमिनीतून समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन खोदण्या विरोधात गावातील रामकृष्ण सानप, छगन सानप, गुलाबराव संडे यांच्यासह त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी याबाबत प्रशासनाला वारंवार विनंती करून आत्मदहनाचा इशाराही दिला होता. मात्र, त्यांची दाखल कोणीही घेतली नाही. त्यामुळे गुरुवारी, आज न्याय मिळाला नाही तर आत्महत्याच करतो, असे ग्रामस्थांना सांगितले आणि ते रॉकेलची कॅन सोबत घेऊन अमरावतीला गेले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विष घेतले.

अनिल यांच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती तर अनर्थ टळला असता, असे मत त्यांचे चुलत भाऊ निवृत्त पोलीस अधिकारी डॉ. पुरुषोत्तम चौधरी आणि नागपूरला स्थायिक झालेले दुसरे चुलत भाऊ दिगंबर चौधरी यांनी मांडले. चौधरी यांच्या जाण्यामुळे लोहागाववासीयांना मोठा धक्का बसला आहे. चौधरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावात फलक लागले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी देवेंद्र चौधरी यांनी घेतली आहे. मात्र, शासन अनिल चौधरी यांच्या मुलांना न्याय देईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details