अमरावती -जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. वीज अंगावर पडल्याने निंबोली येथील पद्माकर वानखडे वय (45) यांचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. वानखडे यांच्या पश्चात 2 लहान मुली पत्नी असा परिवार आहे.
पद्माकर वानखडे यांचेकडे २ एकर शेती आहे. खरीप हंगाम सुरू झाल्याने ते शेतात मशागतीचे काम करत होते. याचदरम्यान पाऊस आला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगिर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
पुढील तीन दिवसांत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक दक्षता पाळण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आवाहन करण्यात आले आहे. तशा सूचनांचे परिपत्रकही प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांच्याकडून निर्गमित करण्यात आले आहे.
काय दक्षता घ्यावी?
वादळी वारा आणि वीजा चमकत असल्यास घरातील खिडक्या, दारे बंद ठेवावेत. कुंपणापासून दूर राहावे. मेघगर्जना झाल्यानंतर तीस मिनीटे घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित निवारा शोधून तिथे आसारा घ्यावा. ट्रॅक्टर, सायकल, बाईक, शेती अवजारे यांच्यापासून दूर राहावे. गाडी चालवत असल्यास सुरक्षीत स्थळी थांबावे. उघड्यावर असाल व सुरक्षीत निवारा जवळपास नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांनी झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या व लोंबकळणाऱ्या विद्युत तारांपासून दूर राहावे. जंगलात असाल तर दाट, लहान झाडाखाली व उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू काय करू नये?
मेघगर्जनेसह वादळ आल्यास उंच जागांवर, टेकड्यांवर, मोकळ्या जागांवर, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, वीजेचे खांब, उघडी वाहने, पाणी आदी ठिकाणी जाणे टाळावे. घरात असाल तर फोन, मोबाईल, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज जोडणीला लावू नये. विजा चमकत असतील तर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर टाळावा. अशावेळी आंघोळ करणे, हात धुणे, भांडी किंवा कपडे धुणे टाळावे. घराबाहेर असाल तर मेघगर्जनेच्या वेळी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. असे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्षाचे अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले आहे.
वीज पडल्यास काय कराल?
दुर्दैवाने वीज पडल्यास बाधित व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमीनीमध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा जेणेकरून हायपोथेरमियाचा (शरीराचे अतिकमी तापमान) धोका कमी होईल. इजा झालेल्या व्यक्तीचे श्वसन बंद झाल्यास तोंडावाटे पुनरुत्थान (माऊथ टू माऊथ) प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद झाल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती सीपीआर करून सुरू ठेवावी.
हेही वाचा -परिवहन विभागाचा खासगी बस चालकांना ठेंगा; बस मालक सरकारवर नाराज