अमरावती- घरात अठरा विश्व दारिद्र्य आठ सदस्यांचे कुटुंब पण कमावणारे फक्त दोन हात, त्यातही निसर्ग कोपतोय. गेल्या वेळी नाहीतर यंदा तरी उत्पन्न निघेल, या आशेने शेतकरी कर्ज काढून पेरता झाला. मात्र, निसर्गाची अवकृपा आणि राजकारण्यांच्या दिरंगाईने आलेल्या सुलतानी संकटामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. अशाच प्रकारे अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिध्दनाथपूरचे शेतकरी सुधाकर पाटेकर यांनी देखील यावर्षी मोठ्या आशेने सोयाबीन जमिनीत रुजवलं, पण हाता- तोंडाशी आलेल्या सोयाबीनचं पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतले. शेत पाण्याने तुडुंब भरलं होतं, सोयाबीनचं उत्पन्न मिळणं अशक्य होतं.. त्यातचं लोकांचं कर्ज फेडावे कसं, मुलीचं शिक्षण, लग्न याचा सर्वाचा खर्च करायचा कसा? या विवंचनेत सुधाकर रावांनी काळजावर दगड ठेवला आणि शेतातील पिकाकडे पाहतच विषाचा घोट घेऊन या जगाचा कायमचा निरोप घेतला.
अठरा विश्व दारिद्र्य त्यात निसर्गाचा कोप.. माता-पित्यानंतर सुधाकरनेही सोडली आयुष्याची साथ..
पिकाची चांगली मशागत केली. काही दिवसातच शेतातून निघणारे उत्पन्न घरी येणार होते. पण 15 दिवस मुक्कामाला आलेल्या आळशी पावसाने महाराष्ट्रतील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करून टाकले. त्याचा फटका सुधाकररावांनाही बसला, शेतात डोलणारं सोयाबीन सडायला लागले, हे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाचा गाडा हाकनाऱ्या या बळीराजाने आपली जीवन यात्रा संपवली.
सुधाकर यांनी यावर्षी शेती पेरण्यासाठी उसनवार कर्ज घेतले होते. कशीबशी शेती पेरली पण मध्यंतरी एक महिना पावसाने दडी मारली अन् शेतात डोलणाऱ्या पिकाने जीव सोडला. पण संकटाच्या मालिकांची उमेद सुरू असताना सुद्धा सुधाकर यांनी पुन्हा पेरणी केली. पिकाची चांगली मशागत केली. काही दिवसातच शेतातून निघणारे उत्पन्न घरी येणार होते. पण 15 दिवस मुक्कामाला आलेल्या आळशी पावसाने महाराष्ट्रतील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करून टाकले. त्याचा फटका सुधाकररावांनाही बसला, शेतात डोलणार सोयाबीन सडायला लागले, हे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाचा गाडा हाकनाऱ्या या बळीराजाने जीवन यात्रा संपवली.
सुधाकर यांच्या वडिलांना कर्करोगाने ग्रासले होते. जन्मदात्या पित्याला वाचवण्यासाठी उसणवार पैसे आणले, पण ऐन दसरा सणादिवशीच त्यांचे निधन झाले.पतीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या सुधाकर रावांच्या आईनेही जीव सोडला. पाटेकर कुटुंबाकडे महाराष्ट्र बँकेचे 65 हजार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचेही काही कर्ज आहे.
सुधाकरराव यांना तीन मुली एक लहान मुलगा, मुलीचे शिक्षण, एक मुलगी लग्नाला आली, लोकांचं कर्ज याच विवंचनेने सुधाकर पाटेकर या शेतकऱ्याचा मेंदू पोखरून टाकला होता. परिस्थितीशी दोन हात करून झगडणाऱ्या सुधाकर रावांनी अखेर हार मानली यातूनच त्यांनी आपलं जीवन संपवलं. मृत्यूनंतर तरी शासनाने तात्काळ मदत द्यावी, यासाठी त्यांचा मृतदेह गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता. आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांच्या कुटुंबाला शासन मदत देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.