अमरावती -लोकसभा निवडणूक प्रचारात महाराष्ट नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्तारूढ महायुतीच्या विरोधात रान उठवत अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यात देशातील पहिले डिजिटल गाव असणाऱ्या मेळघाटातील हरिसालचाही उदोउदो झाला. हरिसाल राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. यानंतर 'ईटीव्ही भारत'ने प्रत्यक्ष हरिसालला भेट देत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावरुन दुर्गम आदिवासी भाग असणाऱ्या हरिसालमध्ये 'डिजिटल इम्पॅक्ट' जाणवतो ही वस्तुस्थिती आहे, असे आमच्या निदर्शनास आले.
अमरावती शहरापासून सुमारे ११५ किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगेत धारणी मार्गावर हरिसाल गाव वसलेले आहे. २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या डिजिटल व्हिलेज योजनेतंर्गत हरिसालला देशातील पहिले डिजिटल व्हिलेज होण्याचा मान मिळाला. २०१६ पूर्वी गावात मोबाईल फोन आले. मात्र, या फोनसाठी नेटवर्क शोधायला धारणी किंवा लगतच्या मेळघाटातील मोबाईल टॉवरचा शोध घेत ग्रामस्थांना शेकडो मैल अंतर फिरावे लागायचे. हरिसाल डिजिटल होताच गावात मोबाईल टॉवर तर उभारला गेलाच मात्र सोबतच गावात सर्वत्र वायफाय सुविधाही उपलब्ध झाली.
हरिसालला आल्यावर 'जल्दीफाय' या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या मोफत वायफाय साठी रजिस्ट्रेशन करावे लागते. गावातील माणसं गावात येणाऱ्या पाहुण्यांना वायफायसाठी मोठ्या आनंदाने रजिस्ट्रेशन करून देतात आणि 'साहेब सुरू झाला ना इंटरनेट, लागतो ना आता आमच्या गावातून कॉल' असे विचारणाही करतात. हरिसालमध्ये 'वायफाय' सुविधा हवी असेल तर एक अट आहे. ज्यांच्याकडे आयडिया कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांना डिजिटल हरिसाल अनुभवता येते अन्यथा मेळघाटातील इतर गावांप्रमाणेच हरिसालमध्येही इंटरनेटचे जग शोधूनही सापडणे नाही.
सर्व विद्यार्थ्यांना टॅब दिल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा फोल -
शासकीय शाळेत अद्ययावत कॉम्प्युटर लॅब आहे. एकमात्र खरे की, मुख्यमंत्र्यांनी हरिसालमध्ये सर्व विद्यार्थ्यांना टॅब दिला असल्याचे ट्विट केले असले तरी हरिसालच्या शाळेत केवळ २ टॅब आहेत. हे टॅब विद्यार्थी हाताळत नसून शिक्षक टॅबद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देतात, असे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनीच 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.