अमरावती - तिवसा मतदारसंघातील 10 गावांमधील 13 हजार मतदारांना मतदानासाठी वाटण्यात आलेल्या स्लिपवर निवडणूक आयोगाने चुकीची वेळ नमूद केल्याने स्थानिक मतदार संभ्रमात होते. आयोगाकडून वाटण्यात आलेल्या हजारो स्लिपमध्ये तांत्रिक कारणांमुळे मतदानाची वेळ सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत असल्याचे छापण्यात आले होते.
'एटीव्ही भारत इम्पॅक्ट'; मतदानाच्या वेळेत घोळ झालेल्या 13 हजार मतदारांना मिळणार नवीन स्लिप यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने बातमी दिल्यानंतर संबंधित घटनेची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन या स्लिप रद्दबातल ठरवल्या आहेत. तसेच निवडणूक विभागाकडून काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकार घडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले.
सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाकडून प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. यंदा निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत आहे. या ठरवलेल्या वेळेनुसार मतदार यावर्षी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परंतु, आयोगाने छापलेल्या स्लिपवर ही वेळ रात्री बारा पर्यंत लिहिली गेल्याने मतदार संभ्रमात होते.
दरम्यान, या गंभीर प्रकारची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसारित करताच निवडणूक आयोगाने पुन्हा या 13 हजार मतदारांना सुधारित वेळेच्या स्लिप द्यायला सुरुवात केली आहे.