अमरावती- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर बाहेर पडू नये, घरातच बसून काळजी घ्यावे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची वेळ येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला घरपोच भाजीपाला, किराणा, वैद्यकीय सुविधा देण्याबाबत नियोजन आखले आहे. येत्या एक-दोन दिवसात त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
अत्यावश्यक सुविधा मिळणार घरपोच... हेही वाचा-लॉक डाऊन : रत्ने आणि मौल्यवान परिषद कर्मचाऱ्यांना देणार ५० कोटींचा निधी
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या संकट काळात घरपोच किराणा कसा उपलब्ध करुन देता येईल. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी विशेष बैठक घेण्यात आली. पालकमंत्री यशोमती ठाकुर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह शहरातील व्यापारी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना यशोमती ठाकुर म्हणाल्या की, सध्याची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर गर्दी होऊ नये यासाठी विशेष अशी दक्षता बाळगली जात आहे. नागरिकांना किराणा, भाजीपाला या अत्यावश्यक सुविधांसाठी घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे या अत्यावश्यक सुविधा घरापर्यंत कशा पुरविता येतील यासंदर्भात बैठकीत योजना आखण्यात आली आहे.
अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठादारांना पासेस देण्यात येणार आहेत. नांदगाव पेठ तसेच सातुर्णा येथील एमआयडीसीमध्ये तेल तसेच धान्याचे व्यापारी आणि बेकरीत काम करणाऱ्या बाबतही बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच व्यवस्था अधिक सुरळीत कशी करता येईल. याबाबत महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. असे असले तरी लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे यशोमती ठाकुर म्हणाल्या.