महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तू मटण खाऊन आला म्हणून भारत मॅच हरला' म्हणत मोठ्या भावानं केला लहान भावाचा खून - बडनेरा पोलीस स्टेशन

Amravati Crime News : वर्ल्डकपची फायनल मॅच हारल्याच्या रागातून मोठ्या भावानं सख्या लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Amravati crime news
Amravati crime news

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 9:31 PM IST

अमरावती Amravati Crime News : दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावानं लहान भावाचा लोखंडी रॉड मारून खून केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. अमरावती शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंजनगाव बारी येथे हा प्रकार घडला. प्रवीण इंगोले असं आरोपी भावाचं नाव असून, अंकित इंगोले असं मृतकाचं नाव आहे.

काय घडलं : अंजनगाव बारीच्या बारीपुरा येथे रमेश इंगोले (वय ६५) हे मुलगा अंकित (वय २८) आणि प्रविणसह (वय ३२) राहतात. रविवारी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अंकित वडिलांना घेऊन मामाच्या घरी गेला होता. तेथे मटनाचा बेत करण्यात आला होता. जेवण केल्यानंतर दोघेही दुपारी २ वाजता घरी पोहचले. ते सोबत प्रविणसाठी मटनाचा डबा घेऊन आले होते. त्यावेळी प्रविण दारुच्या नशेत भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहत होता.

भारत मॅच हारला म्हणून संताप : दरम्यान, सायंकाळी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु झाली. तेव्हा प्रविण सतत दोघांना शिवीगाळ करत होता. रात्री ९ च्या सुमारास भारत सामना हारल्यानंतर प्रविण आणखीनच संतापला. "तुम्ही मटन खाऊन आले म्हणून भारत मॅच हरला", असं म्हणत त्यानं दोघांना शिविगाळ सुरू केली. त्यामुळे वडिलानं प्रविणला मोबाईल फेकून मारला. यानंतर प्रविणनं रागानं घरातील लोखंडी रॉडनं वडिलांच्या पायावर जबर मारहाण केली. त्याला अडवण्यासाठी अंकित गेला असता प्रविणनं अंकितच्या डोक्यात लोखंडी रॉडनं चार-पाच वार केले. अंकितनं बचावासाठी घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ठेच लागल्यानं तो खाली पडला.

डोक्याला मार लागल्यानं मृत्यू : यानंतर घाबरलेले वडील स्वतःचा जीव वाचवत घराबाहेर आले आणि त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केलं. परंतु दुसरीकडे अंकित रात्रभर घरातच पडून होता. सकाळी शेजाऱ्यांनी पाहिलं असता त्यांना तो मृतावस्थेत आढळला. यानंतर त्यांनी बडनेरा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अंकितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. डोक्याला गंभीर मार लागल्यानं अंकितचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय. त्यानंतर पोलिसांनी जखमी रमेश इंगोले यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा नोंदवून प्रविणला अटक केली. या प्रकरणी बडनेरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. जयपूरमध्ये एका तरुणानं केली पत्नी आणि दोन मुलींची हातोड्यानं वार करुन हत्या
  2. धक्कादायक! मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं रागावले वडील; मुलानं संपवलं जीवन
  3. नात्याला काळिमा: क्षयरोगानं ग्रस्त मुलीवर नराधम बापाचा अत्याचार, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details