अमरावती -हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून विदर्भामध्ये वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवार, कर्ज घेऊन पैसे उभे करत आपल्या शेतात घाईगडबडीने पेरणी केली. पण, पेरणीनंतर अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिके कोमेजू लागले तर काही ठिकाणी पावसाआभावी बियाणे उगवलीच नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आला आहे. त्यामुळे दर्यापूर तालुक्यातील येवदा परिसरातील हताश झालेल्या संतोष तिडके या शेतकऱ्याने आपल्या कपाशीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.
कर्ज काढून शेतात पेरणी केली. पण, दडी मारलेल्या पावसामुळे ते बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे आता दुबार पेरणी कशी करावी, असा प्रश्न संतोष तिडके यांच्या समोर उभा ठाकला आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. काही शेतकऱ्यांची पेरणी पावासाआभावी रखडली आहे. पुरेसा झाला नाही अन् पेरणी झाली नाही तर हा हंगाम वाया जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
कोरोनाकाळातही अमरावती विभागात 1 हजार 357 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
मागील 20 वर्षांपासून सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा दुर्दैवी ठपका बसलेल्या पश्चिम विदर्भात आजही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कोरोनाकाळातही पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती विभागात 1 हजार 357 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.