अमरावती -जिल्ह्यातील अमरावती, भातकुली आणि चांदुर बाजार या तालुक्यांतील अनेक गावांत रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. या अतिपावसाने अनेक गावांतील शेत वाहून गेले, तर काही गावात घरांची पडझड झाली. सुमारे अर्धातास बरसलेल्या पावसाने अनेक गाव जलमय झाले.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत प्रतिनिधी' आणि शेतकरी हेही वाचा -मेळघाटात सर्पदंश झालेल्या महिलेला रुग्णालयात न नेता मांत्रिकाकडून उपचार, महिलेचा मृत्यू
शेत गेले वाहून
भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू आणि सहूर, रामा आष्टी यासह चांदुर बाजार तालुक्यातील खरडी, शिरजगाव बंड, बेलोरा, बेसखेड, शिराळा, खराडा, जवळा या गावांत शेतातील पीक वाहून गेले. या परिसरात अनेक शेत हे पाण्याने तुडुंब भरले आहेत. यावर्षी बियाण्याचा भाव दुप्पट असताना ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसाने शेत खरडून गेल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत.
घरांची पडझड
रविवारी झालेल्या पावसात पुसदा, सहूर या गावांत कंबरभर पाणी साचले असताना पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरात ठेवलेले धान्य, कागदपत्र ओले झाले. अनेकांनी रात्र जागून काढली तर ज्यांच्या घरात पाणी शिरले अशा कुटुंबांना राहण्याची व्यवस्था गावातील मंदिरात करण्यात आली होती.
काका-पुतण्या गेलेत वाहून
भातकुली तालुक्यात येणारा खरताळेगाव येथील नाल्याला पूर आला असताना अनिल गुढदे आणि प्रवीण गुढधे हे दोन युवक पुरात वाहून गेले. सोमवारी सकाळी बचाव पथकाला खारतळेगाव पासून तीन कि.मी अंतरावर दोघांचेही मृतदेह सापडले.
पालकमंत्र्यांनी दिले पंचनामे करण्याचे आदेश
अतिपावसामुळे झालेल्या नुकसनाबाबत पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. पालकामंत्र्यांच्या आदेशानुसार अतिवृष्टी झालेल्या गावात अधिकारी भेट देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत आहेत.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांची वागणूक बघता ते 'नैराश्यात' गेल्यासारखे वाटतात - यशोमती ठाकूर