अमरावती -गेले चार दिवस मेळघाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मेळघाटमध्ये रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेळघाटातील सेमाडोह-माखला व चुनखडी मार्गावरील दीड किलोमीटरपर्यंत पहाड खचल्याने या मार्गावरील तीन गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन हे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. सोयी सुविधाचा अभाव असल्याने किमान एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी या मार्गावरील साचलेला चिखल व दरड हटवण्यासाठी लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला -
दरम्यान, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल, झाडे, दगडांचा मोठा खच तब्बल दीड किलोमीटरपर्यंत साचला आहे. त्यामुळे या ठिकाणी साधन व साहित्य पोहचण्यासाठी वेळ लागणार आहे. पहाड खचून दरड कोसळल्याने माखला, बीच्छुखेडा व माडीझडप ही तीन गावे गेल्या चार दिवसांपासून संपर्कक्षेत्रा बाहेर आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेली दरड तातडीने हटवण्याची गरज आहे. त्याचबरोबर परतवाडा-सेमाडोह-भुतखोरा पुल पावसाने क्षतिग्रस्त झाल्यामुळे परतवाडा-धारणी मार्गावरील जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे माखला गावाचा दोन्हीकडून संपर्क तुटला आहे. तर घाटवळणाच्या घाटात सुमारे अर्धा किमीपर्यंत दरड कोसळल्याने वाहतूकीचा मार्ग बंद झाला आहे. त्या ठीकाणी एका बाजूला पर्वतरांगा, तर दुसरीकडे जिवघेण्या दरी आहेत. अतिवृष्टीमुळे व मुसळधार पावसामुळे दरीचा मुरूमचा भाग नरम पडला असल्यामुळे दरीकडील भाग कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दरड कोसळण्याच्या घटनेचा आरोग्य सेवेला ही जबर फटका बसला आहे. काल एका गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रसूतीसाठी नेत असताना दरड कोसळल्याने या महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्यात आली.
हेही वाचा -Mahad Landslide : 'या' कारणामुळे तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवले