महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शवदाहिनी तोडफोड प्रकरण : भाजप नगरसेवकांच्या अपयशामुळेच मनसे नागरिकांच्या मदतीला - अमरावती पप्पू पाटील पत्रकार परिषद

मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शवदाहिनी तोडफोड प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. भाजप नगरसेवकांच्या अपयशामुळेच मनसे नागरिकांच्या मदतीला गेली असल्याचे त्यांनी म्हटले.

amravati latest news
शवदाहिनी तोडफोड प्रकरण : भाजप नगरसेवकांच्या अपयशामुळेच मनसे नागरिकांच्या मदतीला

By

Published : May 31, 2021, 9:01 PM IST

अमरावती -शहरातील हिंदू स्मशानभूमीतील शवदाहिनीची मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा विषय पेटला आहे. आता मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. स्मशानभूमी परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या भागातील भाजपचे चारही नगरसेवक अपयशी ठरल्याने आम्ही त्या लोकांच्या मदतीला धावून गेलो असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया

'भाजप नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी' -

हिंदू स्मशानभूमीत दोन शवदाहिन्यांमधून निघणार धूर परिसरातील लोकांच्या घरात जातो. याबाबत स्मशानभूमी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या भागातील भाजपच्या चारही नगरसेवकांकडे तक्रार दिली होती. आता तिसरी शवदाहिनी भाजपच्या विधानपरिषद सदस्याने दान स्वरूपात दिली. असे असताना आपण निवडून दिलेल्या आमदारकडे नगरसेवकांनी जाऊन तिसरी शवदाहिनीचा काय दुष्परिणाम होतो, हे सांगायला हवे होते. मात्र, हे काम या नगरसेवकांनी केले नाही. यांच्या महापौरांनीही याची दखल घेतली नाही. खरे तर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास भाजप अपयशी झाल्याने आम्हाला त्या परिसरातील नागरिकांची मदत करावी लागली, अशी प्रतिक्रिया पप्पू पाटील यांनी दिली.

'अधिकारी पैसे कामविण्यात व्यस्त' -

कोरोनाकाळात व्यापार ठप्प आहे. अनेकांचा रोजगार, नौकऱ्या अडचणीत असताना 2 लाख रुपये पगार घेणारे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी बैठका घेण्यात आणि पैसे कुठून कमावता येईल, यात व्यस्त असल्याचा आरोप पप्पू पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी स्थानिक व्यक्ती नसल्याने त्यांना अमरावतीशी जिव्हाळा नाही, त्यामुळे अमरावतीत कोरोना आटोक्यात येत नाही, असेही पप्पू पाटील म्हणाले.

'ती शवदाहिनी स्टँडबाय होती, हे माहिती नव्हते' -

तिसरी शवदाहिनी स्टँडबाय होती, हे प्रशासन आता सांगत आहे. ही बाब आम्हाला आधी कळली असती, तर असा प्रकार घडला नसता, असेही पप्पू पाटील म्हणाले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी ही शवदाहिनी स्टँडबाय असली, तरी तिला आमचा विरोध असल्याचे म्हटले होते. शवदाहिनी स्टँडबाय असणार आणि चालू शवदाहिनी बंद पडली, तर ही सुरू करणार, हे याआधीच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत पत्रकारांनी पप्पू पाटील यांना विचारले असता, तशी कुठलीही माहिती आमच्यापर्यंत आली नसल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा - बडनेरात पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details