अमरावती- उपकोषागार अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत लोटांगण घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील तिवसा उपकोषागार कार्यालयात हा प्रकार घडला आहे. संबंधीत विभागाच्या सहसंचालकांना कळताच त्यांनी या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील मद्यधुंद अधिकारी अजय सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे प्रतिक्रिया देताना सांगितले.
अमरावती: मद्यधुंद अवस्थेत उपकोषागार अधिकाऱ्याचे आपल्याच कार्यालयात लोटांगण.. - उपकोषागार कार्यालय तिवसा
उपकोषागार अधिकारी अजय सोनटक्के हे आज आपल्याच कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आढळले. अत्यंत महत्वाचा विभाग व त्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका जबाबदार अधिकाऱ्याने चक्क कार्यालयातील कक्षात यथेच्छ दारू घेऊन लोटांगण घालण्याचा गंभीर प्रकार आज समोर आला. एवढेच नाही तर या अधिकाऱ्याने कक्षातील आसनाखाली लोटांगण घातले होते.
तिवसा येथे उपकोषागार कार्यालय आहे. या ठिकाणी मुद्रांक विक्रीसह, शासकीय कार्यालयातील पगार बिल, चलान आदी कामे पाहिली जातात. दोन महिला कर्मचाऱ्यांसह कर्मचारी व उपकोषागार अधिकारी असे एकूण 4 जण येथे कार्यरत आहेत. त्यापैकी उपकोषागार अधिकारी अजय सोनटक्के हे आज कार्यालयातच मद्यधुंद अवस्थेत आढळले. अत्यंत महत्वाचा विभाग व त्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका जबाबदार अधिकाऱ्याने चक्क कार्यालयातील कक्षात यथेच्छ दारू घेऊन लोटांगण घालण्याचा गंभीर प्रकार आज समोर आला. एवढेच नाही तर या अधिकाऱ्याने कक्षातील आसनाखाली झोप घेतल्याचे समोर आले होते. माजी जि.प. सदस्य संजय देशमुख हे या कार्यालयात काही कामानिमित्त आले असता, मद्यधुंद अधिकारी कार्यालयीन वेळेत त्याच्याच कक्षेत खाली पडून असल्याचे निदर्शनास आले.
शासनाच्या उपकोषागार कार्यालयाचा एक जबाबदार अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दारू पिऊन कार्यालयात झोपा काढत असेल तर अशा बेशिस्त, बेजबाबदार अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.