अमरावती- शेतातील सर्व प्रकारच्या पिकांवर विविध स्वरूपाच्या रासायनिक फवारणी आता ड्रोनद्वारे केली जाणार आहे. राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ड्रोनद्वारे शेतात फवारणीचा राज्यातला हा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे आता शेतीही डिजिटल होऊ लागली आहे.
आता शेतातील पिकांवर होणार 'ड्रोन'द्वारे फवारणी; कृषिमंत्र्यांसमोर प्रात्यक्षिक सादर मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर रासायनिक औषधींची फवारणी करताना काही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात विषारी द्रव्य गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर, सुमारे 800 जणांना याची बाधा झाली होती. आता शेतातील फवारणी ही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू नये आणि झटपट फवारणी व्हावी, या उद्देशाने नाशिक येथील एका कंपनीने शेतात फवारणीसाठी ड्रोनची निर्मिती केली आहे.
आज या ड्रोनद्वारे मायवाडी येथे फवारणीचे प्रात्यक्षिक कृषिमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले. अवघ्या 5 तासात 100 एकर शेतातील पिकांवर या ड्रोनद्वारे फवारणी शक्य असून याची संपूर्ण तपासणी पूर्ण होताच हे ड्रोन राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांच्या गटाला ज्याप्रमाणे अवजार बँक उपलब्ध करून दिली, त्या स्वरूपातच फवारणीसाठीचे ड्रोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय येत्या काळात घेतला जाईल. ड्रोन 20 मीटरपर्यंत वर जाऊन कीटकनाशकांची फवारणी करू शकते. ड्रोनद्वारे समांतर फवारणी होऊ शकते, असेही कृषीमंत्री यावेळी म्हणाले.
ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर झाले तेव्हा मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, डॉ. वसुधा बोंडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, राज्य कृषी महामंडळाचे संचालक पियुष कारंजकर, विभागीय व्यवस्थापक दिलीप ब्राम्हणकर यंचयसह शेतकरी उपस्थित होते.