अमरावती - मोदी सरकारकडून जो अर्थसंकल्प जाहीर केला, तो मी पूर्णपणे ऐकला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच स्तरातील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. परंतु, अर्थसंकल्पातील घोषणांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होईल, तेव्हाच मी समाधानी असेल, असे मत नैसर्गिक शेतीचे निर्माते डॉ. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातील झिरो बजेट शेतीवर मांडण्यात आलेल्या तरतूदींवर प्रतिक्रिया देताना सुभाष पाळेकर म्हणाले, झिरो बजट शेती ही धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना परवडणारी नाही. धानासारख्या पिकात शेतकऱ्यांना आंतरपीक घेता येत नाही. झिरो बजेट शेतीला 'डॉ सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती' हे नाव द्यावे, अशी मागणीसुद्धा मी केली परंतु तसे झाले नाही.