अमरावती - स्वातंत्र्य सेनानी, थोर समाजसेवक आणि अमरावतीचे भूषण असलेले 'विदर्भ महारोगी सेवा समिती तपोवन'चे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव अमरावतीच्या तपोवन येथील शिव उद्यानात शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय कुलकर्णी, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई, नियामक समिती सदस्य विवेक मराठे, डॉ. गोविंद कासट, संस्थेचे सचिव वसंत बुटके, विद्या देसाई, माजी विद्यार्थी कांचन पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजाने ज्यांना नाकारले त्या कुष्ठरोगी बांधवांना दाजी साहेबांनी एका सकारात्मक ध्येयातून स्वीकारले. तपोवन संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या हातांना सक्षम करीत कुष्ठरोगी स्वातंत्र्य व्यक्तिमत्व दिले. दाजी साहेबांनी दिलेली विचारधारा व ध्येयातून आजवर तपोवन ही संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये तपोवन नव्याने व्यापक स्वरूप साकारेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी यांनी या सोहळ्यात व्यक्त केला.